Glimpses of International Conference held @ Liege University, Belgium…

चर्चासत्र अहवाल – नववा आंतरराष्ट्रीय वेदिक वर्कशॉप, लीज युनिव्हर्सिटी, लीज बेल्जियम

नववा आंतरराष्ट्रीय वेदिक वर्कशॉप १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत लीज युनिव्हर्सिटी, लीज बेल्जियम येथे पार पडला. मुंबई विद्यापीठाकडून प्रा. डॉ. माधवी नरसाळे यांच्या नेतृत्वाखाली हर्षदा सावरकर (पीएचडी संशोधन छात्र, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ), रेणुका पांचाळ (ऍड हॉक साहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी संशोधन छात्र, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ), गीतांजली शाह (पीएचडी संशोधन छात्र, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ), अनुजा पुरंदरे (एम.ए. विद्यार्थिनी – सेंटर फॉर हिंदु स्टडीज, मुंबई विद्यापीठ) यांनी या चर्चासत्रात सहभाग घेऊन आपले शोधनिबंध वाचले. पहिल्या दिवशी रेणुका पांचाळ आणि प्रा. डॉ. माधवी नरसाळे यांचा ऋग्वेदातील अक्षसूक्ताचे (१०.३४) मानसशास्त्रीय विवेचन करणारा शोधनिबंध वाचला गेला. यावर छान चर्चा झाली आणि मानसशास्त्रीय दृष्टीने या सूक्तावर केला गेलेला विचार नावीन्यपूर्ण वाटला. दुसर्‍या दिवशी निरुक्तकार यास्काच्या व्युत्पत्तिप्रक्रियेवर प्रकाश टाकणारा आणि त्याचा धर्मशास्त्रात कसा उपयोग केला जाऊ शकतो याचा विचार करणारा निबंध अनुजा पुरंदरे आणि प्रा. डॉ. माधवी नरसाळे यांनी सादर केला. हा ही विषय विद्वानांना भावला आणि त्यांनी वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे समाधान करून घेतले. तिसर्‍या दिवशी हर्षदा सावरकर हिने प्रा. डॉ. माधवी नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करत असलेल्या पीएचडीच्या विषयाला धरून तिचा शोधनिबंध सादर केला. त्याचे सादरीकरण, विषयाकडे पाहण्याचा दृष्टीकोण आवडल्याचे अनेकांनी सांगितले. प्रा. यान ह्युबन (पीएसएल युनिव्हर्सिटी, पॅरिस) यांनी या विषयासंदर्भात आणखी वाचण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना केल्या. यानंतर चौथ्या दिवशी गीतांजली शाह आणि प्रा. डॉ. माधवी नरसाळे यांनी एकत्रित त्यांचा ’कारीरी इष्टि’ या विषयावरील शोधनिबंध सादर केला. मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट ग्रंथालयात असणार्‍या कारीरी इष्टिवरील हस्तलिखितांवर हा शोधनिबंध आधारलेला होता. या विषयावर अभ्यास करताना कारीरी या फळासंदर्भात केलेल्या सर्वांगीण अभ्यासाचे उपस्थित विद्वानांकडून कौतुक करण्यात आले. अशा प्रकारे विविध देशांमधून चर्चासत्रात आलेल्या विद्वानांकडून या चारही शोधनिबंधांना चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यावर चर्चाही झाली. आणि या चर्चेत प्रस्तुत विषयावर आणखी कोणत्या दृष्टीकोणातून काम करता येऊ शकेल याबद्दलही तिथे आलेल्या तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन करण्यात आले.

हा आंतरराष्ट्रीय वेदिक वर्कशॉप १९८९ साली प्रा. मायकेल विट्झेल यांच्या पुढाकाराने सुरु झाला. पहिला वर्कशॉप हार्वर्ड विद्यापीठ, युएसए येथे झाला आणि तेव्हापासून दर दोन किंवा तीन वर्षांनी जगाच्या विविध भागात तो घेण्यात येतो. यंदाचा हा नववा वर्कशॉप होता. वर्कशॉप या नावाप्रमाणेच या चर्चासत्रात वेदाशी निगडित वेगवेगळ्या विषयावर शोधनिबंध वाचले गेले आणि त्यावर सखोल चर्चाही झाल्या. प्रत्येक सहभागी सदस्याला आपला शोधनिबंध वाचण्यासाठी ३० मिनिटांचा वेळ दिला जात होता. यात २० मिनिटे वाचन आणि १० मिनिटे त्यावर प्रश्न, चर्चा होत होत्या. आणि वेळेचे हे विभाजन अगदी कसोशीने पाळले जात होते. विविध देशांमधून आलेल्या ६० विद्वानांनी या चर्चासत्रात सहभाग घेतला होता. पाच दिवस आणि १८ सत्रांमध्ये हे शोधनिबंध विभागले गेले होते आणि या सगळ्या सत्रांना आलेल्या विद्वानांकडून संपूर्ण उपस्थिती होती. प्रत्येक जण अगदी लक्षपूर्वक समोरच्या विद्वानाचे म्हणणे ऐकून घेत होता आणि आवश्यक वाटेल त्या मुद्द्यावर चर्चाही होत होती. हे संपूर्ण नियोजन अगदी शिस्तबद्ध होत असल्याने प्रत्येक उपस्थिताला त्याचे संशोधन मांडण्यासाठी पुरेसा वेळ आणि न्याय देता येत होता. एक मात्र मान्य करायलाच हवे की ही सगळी विद्वान मंडळी वेळेच्या बाबतीत अगदी काटेकोर आणि शिस्तबद्ध होती. सगळी सत्रे दिलेल्या वेळेत सुरु होऊन योग्य वेळेत संपत होती.

वैदिक काव्य, वैदिक व्याकरण, कर्मकांड, अथर्ववेद पॅनेल, मंत्र पॅनेल, कॉस्मॉलॉजी (विश्वोत्पत्ती) अशा विषयांमध्ये आलेल्या शोधनिबंधांची विभागणी झालेली होती. आपापले शोधनिबंध सादर करणारा प्रत्येक विद्वान वक्ता अगदी शांतपणे, संयमित वाणीत अभ्यासपूर्ण पद्धतीने आपले विचार मांडत होता. त्यात कोणताही अभिनिवेश नव्हता. प्रत्येकाच्या निबंधातले आवश्यक महत्त्वाचे मुद्दे पीपीटीवर दाखवले जात होते. यातील जे महत्त्वपूर्ण वाटेल किंवा ज्या विषयावर प्रश्न विचारवासा वाटेल त्याचे फोटो संदर्भाकरिता काढले जात होते. ’अमुक अमुक स्लाईडवर तुम्ही असे म्हटले आहे, तिथे जाऊन आपण ते पुन्हा तपासूया का?’ अशा आशयाचे प्रश्न करून उपस्थित श्रोते हे दाखवून देत होते कि त्यांनी किती बारकाईने ते व्याख्यान ऐकले आहे.

त्यामुळे या चर्चासत्रातून आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मिळालेली महत्त्वाची शिकवण होती कि आपल्या विषयाकडे जास्तीत जास्त गांभीर्याने पाहणे, त्यावर काम करताना किती कमाल शक्यता विचारात घेता येऊ शकतात ते बघणे आणि त्यादृष्टीने आणखी काय काय वाचणे फायद्याचे ठरू शकते, याचा विचार करणे. आमचे सगळ्यांचे निबंध चांगल्या पद्धतीने ऐकले गेले, त्यावर सखोल प्रश्नोत्तरे आणिसकारात्मक मार्गदर्शन झाले याचा जरी आनंद असला तरी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी आणि ती टिकवण्यासाठी भरपूर श्रम करावे लागतील याचे भान या चर्चासत्राने आम्हाला दिले. त्यादृष्टीने सजग राहून, काम करून पुढच्या चर्चासत्रात आणखी ताकदीने सहभागी होण्याचा आत्मविश्वासही या वेदिक वर्कशॉपने दिला, असेच म्हणावे लागेल.

सदर चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरित केल्याबद्दल आणि वेळोवेळी मौल्यवान मार्गदर्शन केल्याबद्दल प्रा. श्रीकांत बहुलकर (चेअर प्रोफेसर, दलाई लामा चेअर, सोमैया विद्याविहार युनिव्हर्सिटी, मुंबई) आणि प्रा. डॉ. माधवी नरसाळे (प्रोफेसर, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ) यांचे आम्ही मनापासून ऋणी आहोत.

– हर्षदा सावरकर,

पीएचडी संशोधन छात्र, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP