आज मुंबई विद्यापिठाच्या संस्कृत विभागप्रमुख प्रा.डॉ. माधवी नरसाळे यांचे भट्टनारायणाच्या “वेणीसंहार” नाटकावरील व्याख्यान रंगले. स्टार प्लसवरील “महाभारत” मालिकेसाठी सल्लागार म्हणुन मार्गदर्शन केलेल्या माधवी मॅडमनी व्याख्यानात तदानुषंगाने देखिल काही विचार मांडले. कलावंत काहीएक स्वातंत्र्य घेऊन मुळ कथेत भर घालत कलाकृती निर्माण करतो त्यावेळी काही पात्रांना काव्यगत न्याय देणे, त्याकाळची सामाजिक, धार्मिक परिस्थिती आणि स्वतः कलाकाराचा पिंड अशी अनेक कारणे यामागे असु शकतात. भट्टनारायणाने या नाटकात दुर्योधनाची व्यक्तीरेखा खर्या अर्थाने स्वतंत्र अशी रंगवली आहे. द्रौपदीच्या मोकळ्या केसांना दु:शासनाच्या रक्ताने बांधण्याची प्रतिज्ञा करणारा भीम आणि त्यानंतर या वेणीमुळे झालेला संहार हे या नाटकाचे मध्यवर्ती सूत्र असले तरी दूर्योधनाचा अहंकारी, बिनधास्त स्वभाव, युद्धावरुन काही काल शिबीरात परत येऊन पत्नीच्या सहवासात रममाण होण्याची त्याची कामी वृत्ती, त्याचे आपल्या भावंडांवरील प्रेम, त्याची कर्णाशी असलेली गाढ मैत्री अशा अनेक “ग्रे” शेडस नी भट्टनारायणाने रंगवलेला हा खलनायक माधवी मॅडमनी सुरेख उलगडुन दाखवला.
भट्टनारायणाने रंगवलेला खलनायक
—–Atul Thakur