योग-सिद्धान्त आणि उपयोजन- परिसंवादाचे वृत्त-२१-२२ फेब्रुवारी २०२३

योग-सिद्धान्त आणि उपयोजन- परिसंवादाचे वृत्त
“पातञ्जल योगसूत्रांनुसार “उपयोजित योग” हा त्याच्या सिद्धांतांच्या आकलनाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही’- असे मत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे मा.कुलगुरू प्रा. मधुसूदन पेन्ना यांनी व्यक्त केले. ‘योग- सिद्धान्त आणि उपयोजन’ या द्विदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन भाषणात त्यांनी आपले विचार मांडले. संस्कृत विभागाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त सुरु असलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांतर्गत संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठाद्वारे या द्विदिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन २१ व २२ फेब्रुवारी रोजी आभासी माध्यमाद्वारे करण्यात आले होते.
प्रा. पेन्नांचे विचार सर्व सहभागी विद्वानांच्या भाषणामध्ये प्रतिध्वनित झालेले दिसून आले. प्रा. पेन्नांनी आदि शंकराचार्य, १० व्या शताब्दीतील काश्मिरमधील अभिनवगुप्ताचे योगसिद्धांत व ज्ञानेश्वरीमधील योगविचार यांचा आढावा घेतला. चर्चासत्राचे बीजभाषक डॉ. गणेश राव म्हणाले, ‘योगाचे लक्ष्य हे मन आणि देह यांच्या पलीकडे जाणारे असून शारीरिक व मानसिक स्वास्थ्य ही केवळ योगाची उपउत्पादने आहेत’. त्यांच्या मते, ‘पतञ्जलि मुनींच्या प्रत्येक सूत्रातच त्याचा प्रयोग समाविष्ट आहे’, आणि हेच परिसंवादाचे तथ्य आणि साध्य होते.
डॉ. मिकी मेहता (ग्लोबल होलिस्टिक हेल्थ गुरु, कॉर्पोरेट लाईफ कोच) यांनी सांगितले की, ‘आसने ही योगाचे अल्पकालीन ध्येय असले तरीदेखील ते अखेरीस समाधी अवस्थेपर्यंत नेण्यास मदत करते’. या द्विदिवसीय परिसंवादात एकूण १२ संशोधनपत्रांचे वाचन विद्वानांनी केले. या संशोधन पत्रांतून आयुर्वेद, बौद्ध-जैन तत्वज्ञान, शाक्त परंपरा आणि उपनिषदे यातील भिन्न भिन्न संदर्भांचे आणि संकल्पनांचे अन्वेषण करण्यात आले.
डॉ.आर.एस. भोगल यांनी ‘ध्यान’ या विषयावर आपले भाष्य केले तर डॉ. जयरामन महादेवन यांनी हठयोगप्रदीपिकेवरील ज्योत्स्नाभाष्याचे महत्व प्रतिपादित केले. डॉ. ग्रॅहम श्वॅग (प्रोफेसर- रिलीजन अॅट ख्रिस्टफर न्यूपोर्ट युनिवर्सिटी, व्हर्जिनिया) यांनी योगसूत्रांच्या अभ्यासाचा पूर्णत: एक नूतन दृष्टिकोन दिला. त्यांनी ‘चित्त’ (योगसूत्रातील सर्वाधिक उपयोगिलेली संकल्पना) या शब्दाचा अनुवाद करताना पारंपारिक अनुवाद नाकारून ‘पूर्णहृदय’ असा अभिनव अनुवाद केला. डॉ. ग्रॅहम म्हणाले, हृदय एक आसन आहे, ज्यावर आत्मस्वरूप आसनस्थ होते. आणि हृदय आत्म्याला अंतिम तत्त्वाकडे नेते. येल युनिवर्सिटी प्रेसच्या २०२३ च्या त्यांच्या योगसूत्राचा अनुवाद व अर्थ या आगामी पुस्तकात त्यांनी चित्त या शब्दाचा हृदय असा अनुवाद करुन योग तत्त्वज्ञानाचा एक नवीन आयाम उलगडला आहे. हे करत असताना त्यांनी वेदांत, उपनिषदे, भगवद्गीता आणि भागवत पुराण इ. च्या संदर्भांचा आधार घेतला आहे.
प्रा. उमा वैद्य (माजी. कुलगुरू, कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, नागपूर) यांनी आपल्या समापन भाषणात दैनंदिन जीवनातील “योग” या शब्दाच्या रंजक शब्दच्छटा उलगडून दाखविल्या. प्राचीन संस्कृत साहित्यातील सुयोग्य संदर्भांची गुंफण असलेले त्यांचे भाषण अत्यंत प्रभावी होते. डॉ.शकुंतला गावडे (विभागप्रमुख, संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ) यांनी परिसंवादाच्या आभारप्रदर्शनाच्या भाषणांतर्गत पुढील शैक्षणिक वर्षापासून योग पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु होत असल्याची घोषणा केली व परिसंवादाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP