महाकवि शूद्रकाच्या मृच्छकटिक नाटकावर आज प्रा.शकुंतला गावडे यांचे व्याख्यान होते. शकुंतला मॅडमनी शूद्रकाच्या व्यक्तीमत्वाचा, त्याच्या कालाचा आढावा घेऊन मग कथानक सांगितले आणि संपूर्ण नाटकाचा अलंकारशास्त्राच्या दृष्टीने सुंदर आढावा घेतला. त्यात शृंगार, करुण, हास्य या सारखे रस, नाटकाला कलाटणी देणार्या घटनांमधुन दर्शवली जाणारी प्रकरणवक्रता, शूद्रकाची मानवी स्वभावाची जाण, त्याने आपल्या पात्रांचे केलेले विस्मयचकित करणारे मनोविश्लेषण अशा अनेक गोष्टींचा उहापोह त्यांनी केला. या नाटकातील हास्यरस उत्पन्न करणारा विनोद हा सर्वसाधारणपणे संस्कृत नाटकात दिसणार्या विनोदापेक्षा कसा वेगळा आहे हे त्यांनी सोदाहरण दाखवुन दिले. हास्यातुन शूद्रकाने केलेल्या कारुण्य निर्मितीबद्दलही त्या बोलल्या.
हे सारं ऐकताना माझ्यासमोर येत होता तो शूद्रकाने निर्मिलेला अतिशय वेगळा असा खलनायक शकार. या खलनायकाच्या संवादाने हास्याच्या उकळ्या फुटतात. हा माणुस बोलताना राम द्रौपदी, रावण, अश्वत्थामा, कुंती, हनुमान अशा कुणालाही एकत्र आणतो. कसलाही संदर्भ कुठेही वापरतो. आणि हशा निर्माण करतो. हा खलनायक विनोदी खराच. पण मला यात सुरुवातीपासुन कुठेतरी कारुण्याची अशी छटा जाणवते. जिच्यावर प्रेम करीत आहोत ती अप्रतिम सुंदरी वसंतसेना चारुदत्ताला आपले हृदय देऊन बसली आहे. तिच्या मागे धावत जाणारा हा खलनायक कदाचित फार कुरुपही असेल आणि त्याला कसलेही ज्ञान नसताना, वेड्यासारखं बडबडत, जमेल तशी तिची मनधरणी करीत तिला मिळवण्याची इच्छा करीत आहे ही बाब मला तरी फार करुण वाटली.
हा खलनायक तर खराच पण खलनायकालाही मन असतं, वेदना असतात, खलनायकाची आई गेली तर त्याला दु:ख होत नसेल काय? कुठेतरी (कुवतीने)अतिशय सामान्य माणसाचे मन दुष्प्राप्य गोष्टीवर जडावे आणि त्यामागे त्याने रक्त ओकेपर्यंत अयशस्वी धावपळ करावी, त्यात स्वतःचे सर्वांसमोर हसे करुन घ्यावे हे सारं मला हास्य निर्माण करणारं वाटत नाही. शकाराबद्दल मला नेहेमी सहानुभुती वाटत राहते.
—-अतुल ठाकुर