प्रा.सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी महोत्सव व्याख्यानमाला वृत्त – “पञ्चकं ना स्मरेन्नित्यम् |”- २५/१०/२०२१ ते २९/१०/२०२१

     

                                

मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग व ॠतायन यांच्या संयुक्त विद्यमाने संस्कृत महोत्सव व प्रा.सदाशिव अंबादास डांगे जन्मशताब्दी महोत्सवाचा भाग म्हणून आयोजित केलेली “पञ्चकं ना स्मरेन्नित्यम् |” ही व्याख्यानमाला दि.२५/१०/२०२१ ते २९/१०/२०२१ रोजी संपन्न झाली. अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मन्दोदरी, कुन्ती या महनीय स्त्रियांची चरित्रे पाच दिवस व्याख्यानस्वरुपात आयोजित करण्यात आली. यासाठी सन्माननीय डॉ.गौरी माहुलीकर, डॉ.मृणालिनी नेवाळकर, डॉ.अरुणा ढेरे यांची व्याख्याने संपन्न झाली.

महाभारत आणि रामायण हे अतिप्राचीन ग्रंथ असले तरी त्यांच्या थोरवीमुळे त्यांच्या संबंधीचे आकर्षण नित्य नूतन असेच आहे. पंडितांपासून ललित लेखकापर्यंत प्रत्येकाला या दोन्ही ग्रंथांनी आकृष्ट केलेले आहे. महाभारत, रामायण हा जसा बुद्धिमंतांच्या प्रज्ञेचा वा ललित लेखकांच्या रस लोभाचा आकर्षण विषय आहे, त्याप्रमाणेच अनेक परस्परविरोधी अटीतटीच्या वादविवादांचे अक्षय्य रणक्षेत्रही आहे. रामायण-महाभारतातील व्यक्ती जशा होत्या तशा रंगविल्या आहेत, का त्यांचे चरित्र पक्षपाताने रंगविलेले आहे? या संबंधीचे मतभेद इतक्या तीव्र स्वरूपाचे आहेत की, “तम: प्रकाशवत् विरुद्ध स्वभावयो:” या पूज्यपाद श्रीशंकराचार्यांच्या वचनानेच त्यांचे वर्णन करावे लागते. या सर्व मतभेदांच्या, विरोधांच्या, विसंगतीच्या रणधुमाळीतूनही रामायण-महाभारताविषयीची ओढ प्रतिक्षणी नवीन रूप धारण करीत आहे. या दोहोंच्या श्रेष्ठतेचे आणि रमणीयतेचे निरपवाद महत्त्व या वस्तुस्थितीने सिद्ध होते आहे. तीनही विदुषींनी नित्यस्मरणीय अहिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मन्दोदरी, कुन्ती अशा या कणखर स्त्रियांचे व्यक्तित्व उलगडले.

              मा.डॉ.गौरी माहुलीकर यांनी अहिल्या व सीता यांचे चरित्र मूल वाल्मीकि-रामायणाचा आधार घेऊन अत्यंत चिकित्सक, अभ्यासपूर्ण संशोधनीय दृष्टिकोनातून उलगडले. व्युत्पत्तिशास्त्र, पुराकथाशास्त्र, स्त्रीवादी दृष्टिकोन या नानाविध अंगांनी अहिल्या व सीता यांचे व्यक्तिमत्त्व डॉ.माहुलीकर यांनी विद्वत्तापूर्ण शैलीत प्रस्तुत केले. पुराकथाशास्त्रामध्ये ‘Hero Myth’ हा नायकाचे विश्लेषण करताना वापरला जाणारा प्रचलित सिद्धांत आहे. परंतु मॅडमनी हा सिद्धांत एखाद्या नायिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करताना विचारात घ्यायला हवा, हा एक महत्त्वपूर्ण विचार आपल्यासमोर मांडला. अहिल्येचा प्रवास हा ‘सामान्यातून असामान्याकडे जाणारा आहे’, तर सीतेचा प्रवास हा ‘असामान्यातून सामान्याकडे कसा जाणारा आहे’ याचा जणू चलचित्रपटच दृष्टीपुढे उभा केला. प्रत्येक जीव हा अहिल्या स्वरूप आहे, शिळारूप हे प्रातिभासिक असून, प्रत्येक जीवातील तमोरूप हे शिळास्वरूप आहे, प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने ती मुक्त झाली. तिचे तमोरूप नष्ट झाले आणि ती शुद्ध, सात्त्विक स्वरुपात आली हा विलक्षण सुंदर विचार डॉ.माहुलीकर बाईंनी मांडला.

                   डॉ.मृणालिनी नेवाळकर यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत तारा व मन्दोदरी या रामायणाधारित स्त्रियांची चरित्रे उलगडताना नानाविध रामायणपरंपरा, बौद्धवाङ्मय, देशोदेशीच्या लोककथा यांचा आधार घेतला. आर्षमहाकाव्य, पुराणग्रंथ कसे अभ्यासावेत याचा जणू वस्तुपाठच त्यांनी विद्यार्थ्यांसमोर प्रस्तुत केला.

               सन्माननीय डॉ.अरुणा ढेरे यांनी स्वत:च्या अत्यंत लालित्यपूर्ण, रसाळ व विद्वत्तेने ओतप्रोत अशा व्याख्यानांनी द्रौपदी व कुन्ती या महाभारताधारित स्त्रियांची चरित्रे उलगडली व श्रोत्यांना अक्षरश: जागीच खिळवून ठेवले. त्यांचे महाभारताचे प्रदीर्घ अध्ययन, साहित्याचा वेध घेणारे पांडित्य, लोकवाङ्मयावरील प्रभुत्त्व या समीकरणातून आपल्यासमोर चित्रित झालेल्या द्रौपदी व कुन्ती या व्यक्तिरेखा निव्वळ अनुपमेय आहेत. द्रौपदी व कुन्ती यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक अनावृत कंगोरे त्यांनी आपल्या सहज शैलीतून उलगडले.

            महाभारताचा विस्तार प्रचंड आहे. सहस्रावधी प्रसंगांचे वर्णन तेथे आले आहे. घटना गुंतागुंतीच्या आहेत. शेकडो व्यक्तींची चित्रणे अगदी नैसर्गिक रंगातील आहेत. त्यांच्या स्वभावात गुणदोषांचे विचित्र मिश्रण झालेले आहे. त्यामुळे चारित्र्याच्या उदात्ततेने प्रभावित झालेल्या वाचकालाही काही ठिकाणी अडखळल्यासारखे होते, आपल्यालाही ‘हे असे घडले नसते तर बरे झाले असते, हे असे वर्तन झाले नसते तर हितकर ठरले असते, हे असे उद्गार काढावयास नको होते’ असे विचार आदरणीय व्यक्तींच्या संबंधातही काही वेळा मनात येतात, यात शंका नाही. उलट दुर्जनांविषयीही कित्येक प्रसंगी कौतुकाची भावना निर्माण होते.

             श्रीकृष्णाने कर्णाला अनेक तऱ्हेची प्रलोभने दाखविली त्यात द्रौपदीचा उल्लेख केला नसता तर बरे झाले असते, असे वाटते. द्रौपदीची विटंबना भरसभेत होत असताना भीष्मांच्यासारखा निष्कलंक चारित्र्याचा थोर पुरुष कोणत्याही कारणाने असा प्रतिकार करीत नाही हे खटकते. द्रोणाचार्य एकलव्याचा अंगठा तोडून मागतात, हे त्यांच्या विद्यादान कौशल्याला बाधक ठरणारे कृत्य आहे यात शंका नाही. युधिष्ठिर पुन्हा पुन्हा हरतो तरी हट्टाला पेटून द्रौपदीलाही पणास लावतो. आणि पुढे द्रौपदीच्या तेजस्वितेने सर्वांची सुखरूप सुटका झाली असताना अनुद्यूताच्या मोहास बळी पडतो. आणि देशोधडीस लागतो. द्यूताच्या व्यसनाने त्याला इतके अविवेकी बनवावे याचे सखेद आश्चर्य वाटते. भीम आणि द्रौपदी त्याच्यावर संतापतात ते योग्य वाटते. विकर्णासारख्या द्रौपदीच्या रक्षणासाठी धावून आलेल्या एकमात्र कौरवाला भीम प्रतिज्ञापालनाच्या भरात ठार मारतो, जिवंत ठेवीत नाही ही गोष्ट मनाला लागून राहते.

                 भगवद्गीतेचा उपदेश ऐकल्यानंतर नष्टमोह होऊन ‘करिष्ये वचनं तव’ असे आश्वासन भगवंताना देणाऱ्या अर्जुनाने प्रतिदिनी दहा हजार वीरांचा संहार प्रतिज्ञेने करणाऱ्या भीष्मांशीही मृदु-युद्ध करावे हे त्याच्या हृदयाच्या कोमलपणाला शोभणारे असले तरीही कर्तव्यनिष्ठेला दूषणावह आहे, असे म्हटल्यावाचून राहवत नाही. जयद्रथाचा वध करीन नाही तर मी स्वत:च प्राणत्याग करीन अशी जी प्रतिज्ञा अभिमन्यूचा घात झाल्यानंतर अर्जुनाने केली ती त्याच्या विवेकशील व गंभीर स्वभावाला साजेशी नाही, याउलट वेदनेने तळमळून मरणोन्मुख झालेल्या दुर्योधनानेही ‘को नु स्वंततरं मया’ असे म्हणावे हे त्याचे धैर्य कौतुकास्पद वाटते.

                  सहज का होईना पण कुंतीच्या मुखातून निघून गेलेल्या ‘पांडवांमध्ये एकी राहावी’ या हेतूसाठी, कुंतीच्या वाक्याचे पांडवांच्या मातृभक्त मनात अनन्यसाधारण महत्त्व होते. आणि सर्व परिस्थितीत मग द्रौपदीचे पांडवांशी लग्न व्हावे, हा जो निर्णय युधिष्ठिराने घेतला तो चुकीचा नव्हता, हे मान्य करावे लागते. युधिष्ठिर द्रुपदाशी जे बोलतो ते आता “स्थितस्यगति: चिन्तनीया” या न्यायाचे असते. द्रौपदीचे पाचांशी लग्न व्हावे हे, अर्जुनाच्या आग्रहामुळे, कुंतीच्यामुखातून निघून गेलेल्या वाक्यामुळे आणि व्यासांच्या पूर्वी ऐकलेल्या बोलण्यामुळे इतर पांडवांच्या मनात उत्पन्न झालेल्या द्रौपदीविषयक अभिलाषेमुळे उचित झाले. आणि हा निर्णय घ्यावा लागला ही गोष्ट लक्षात घ्यावी लागते.

अशी आणखीही काही स्थळे आहेत. पण हे सर्व असतानाही ही प्रकरणे ज्या भागात आली आहेत तो भाग गृहीत भूमिकेशी सुसंगत वाटत नसल्याने प्रक्षिप्त आहे असे मानणे मात्र अयोग्य आहे. कारण खरा इतिहास आणि जिवंत व्यक्ती अशाच असणार.हे आणि असे बरेच मुद्दे डॉ.अरुणा ढेरे यांच्या व्याख्यानातून स्पष्ट झाले.

                तिन्ही विदुषींनी नित्यस्मरणीय अशा या स्त्रियांचे चरित्रपट विविधांगी दृष्टिकोनातून उलगडले तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे,या स्त्रिया अबला, परावलंबी अथवा अस्तित्त्वहीन नसून आत्मविश्वासपूर्ण, संकटांवर मात करण्याचे अतुल्य धैर्य राखणाऱ्या, विचारपरिपक्व आणि दुर्दम्य आशावादी अशा असामान्यता प्रगट करणाऱ्या आहेत. म्हणूनच आपल्या संस्कृतीने त्यांना वंदनीय ठरवून ‘महापातकनाशिनी-प्रात:स्मरणीय’ असे गौरविले आहे. अशा प्रकारे प्रा.स.अं.डांगे यांच्या अभ्यासपद्धतीला अनुसरूनच “पञ्चकं ना स्मरेन्नित्यम् |” ही व्याख्यानमाला संपन्न झाली.

-डॉ.मेधा देशपांडे     

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP