संस्कृत विभागात छन्द-वृत्त कार्यशाळा संपन्न

मुंबई विद्यापीठ संस्कृत विभाग आणि ऋतायन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने छंद-वृत्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ९, १० आणि ११ सप्टेंबर २०१९ रोजी छन्द-वृत्त या विषयावर आयोजित केलेली त्रिदिवसीय कार्यशाळा उत्साहात पार पडली. वैदिक छंद आणि अभिजात वृत्त यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास व्हावा हा हेतू यामागे आहे. ही कार्यशाळा विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक, संस्कृत भाषेचे अभ्यासक आणि संस्कृतप्रेमी या सर्वांसाठी खुली होती. सुमारे ५० जण या कार्यशाळेत सहभागी झाले.

९ सप्टेंबर (पहिला दिवस)

सुरूवातीला सहभागी विद्यार्थ्यांसाठी चहा आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली होती. आणि ठीक अकरा वाजता कार्यशाळेस प्रारंभ झाला. संस्कृत विभागाचे शिक्षक श्री. अजय पेंडसे यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभाग प्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे यांनी या कार्यशाळेचे प्रास्ताविक केले. त्याच बरोबर ऋतायन संस्था, मुंबई आणि संस्कृत विभाग यांचे या कार्यशाळेमागचे प्रयोजन स्पष्ट केले.

कार्यशाळेचे बीजभाषण संस्कृतज्ञ डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी केले. संस्कृत विभागाच्या शिक्षिका हर्षदा सावरकर यांनी डॉ. बहुलकरांचा परिचय करून दिला. डॉ. बहुलकरांनी वैदिक छंद आणि त्यांची उत्पत्ती‌, त्याचे ब्राह्मण ग्रंथातील संदर्भ आणि वैदिक छंदांपासून अभिजात वृत्तांपर्यंतच्या प्रक्रियेचा आढावा घेतला. विविध उदाहरणांनी परिपूर्ण असे त्यांचे बीजभाषण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठरले. त्यानंतर दुपारच्या भोजनानंतर असलेल्या दुसऱ्या सत्रात अमृता विश्वविद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. श्रीहरी गोकर्णकर यांनी वैदिक छंद आणि अभिजात वृत्त यांची विभागणी, तसेच छंदांविषयीच्या दंतकथा याविषयी रोचक भाषण केले. संस्कृत विभागाचे शिक्षक श्री. अजय पेंडसे यांनी डॉ. गोकर्णकरांचा परिचय करून दिला. सत्राच्या उत्तरार्धात गोकर्णकर सरांनी अनुष्टुभ् छंदाचे विविध प्रकार विद्यार्थ्यांना शिकवले. आणि कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अनुष्टुभ् छंदात श्लोकपूर्ती, श्लोक रचना, समस्यापूर्ती करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तसेच विद्यार्थ्यांना उत्तेजन व प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट रचनांसाठी पुस्तक रूपी बक्षीसही दिले. अशाप्रकारे अतिशय उत्साहात आणि अभ्यासपूर्ण वातावरणात कार्यशाळेचा पहिला दिवस पार पडला.

१० सप्टेंबर (दुसरा दिवस)

दिनांक १० सप्टेंबर या कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी डॉ. श्रीहरी गोकर्णकर यांनी दोन सत्रात विविध अक्षरगणवृत्त आणि मात्रा वृत्त यांचे नियम समजावून सांगितले. तसेच विविध उदाहरण त्याचबरोबरीने निरनिराळ्या चित्रपट व भावगीतांची वृत्त ओळख करून दिली. तसेच उत्तम लेखन आणि काव्य करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याही दिवशी डॉ. श्रीकांत बहुलकर सरांनी विद्यार्थ्यांच्या रचनांबाबत त्यांना सुधारणा सुचवल्या आणि आपल्या प्रगल्भ ज्ञानसागराने सहभागींना संतुष्ट केले. त्यानंतर दुसऱ्या दिवसाचे शेवटचे सत्र डॉ. हेमंत राजोपाध्ये यांनी घेतले. संस्कृत विभागाच्या प्राध्यापिका डॉ. माधवी नरसाळे यांनी त्यांचा परिचय करून दिला. डॉ. राजोपाध्ये यांनी वैदिक छंद आणि त्यांच्या अरबी, पर्शियन वगैरे इतर भाषांशी असलेला संबंध या अनोख्या विषयावर व्याख्यान दिले. आणि त्या भाषांमध्ये असलेल्या विविध वृत्तबद्ध रचना यांचे विवेचन केले.

दिनांक ११ सप्टेंबर (तिसरा दिवस)

दिनांक ११ सप्टेंबर या कार्यशाळेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशीचे पहिले सत्र संस्कृत विभागाच्या शिक्षिका हर्षदा सावरकर यांनी घेतले. दिंडी, ओवी, अभंग, फटका यांसारख्या प्राकृत वृत्तांवर त्यांनी व्याख्यान दिले. सहभागी विद्यार्थ्यांना त्या-त्या वृत्तांमध्ये रचना करायला उद्युक्त करून विषय सोपा करून शिकवला. आणि वृत्तांचे नियमही सांगितले.

समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद मुंबई विद्यापीठाच्या भूतपूर्व प्राध्यापिका व विभागप्रमुखा डॉ. सिंधू डांगे यांनी भूषविले. त्यांनी छंद-वृत्तांच्या प्रवासाचा पुराकथांच्या माध्यमातून आढावा घेत अत्यंत अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले. अनेक संशोधनपर बाबींना स्पर्श करत त्यांनी छंद-वृत्तांविषयी प्राचीन ग्रंथामध्ये आलेल्या कथांचा ऊहापोह केला. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना कार्यशाळेच्या उपस्थितीचे प्रमाणपत्र देण्यात आले. डॉ. शकुंतला गावडे यांच्या ऋणनिर्देशाने कार्यक्रमाची सांगता झाली.

– रेणुका पांचाळ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP