विद्यापीठीय संस्कृत विभागाचा अभ्यास दौरा संपन्न:
मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाची अभ्यास सहल घारापुरी लेणी इथे बुधवार दि. 27 मार्च रोजी काढण्यात आली होती. या सहलीमध्ये विद्यापीठाच्या 30 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सकाळी 10 वाजता गेट वे ऑफ इंडिया इथून निघून 11.30 ला सर्वजण घारापुरी लेण्यांजवळ पोहोचले. शिस्तबद्ध आयोजन केलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना लेण्यांविषयी अतिशय उत्तम मार्गदर्शन लाभले. पुरातत्त्व व संस्कृत अभ्यासिका स्नेहा नगरकर यांनी विद्यार्थ्यांना या लेण्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना सुलभ भाषेत समजावून सांगितला. घारापुरी लेणी ही शैवकालीन आहेत. ती सर्वसाधरणपणे इ.स. 900 ते 1200 दरम्यान निर्माण झाली आहेत. या लेण्यांचे प्राचीन नाव ‘श्रीपुरी’ असे होते. या लेण्यांमध्ये एक मुख्य गुहा ज्याला मुख्य मंदप असे म्हणता येईल, असा असून उर्वरित दोन गुहा आहेत. ही लेणी शैव संप्रदाय निर्देशक असून यातील मूर्ती शिवकथांशी संबंधित आहेत. या बेटावरील डोंगरात पाच लेणी खोदलेली आहेत.येथील शिल्पकाम शैव संप्रदायाचे आहे.त्यात अनेक वेचक , निवडक शिवकथा समूर्त झालेल्या दिसतात.या कथांपैकी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, तांडवनृत्य, अंधकासुर वध इ. दृश्ये अतिशय रमणीय असून, साक्षात शिवाचे जीवनच थोडक्यात आपल्यापुढे साकार करतात. रावणानुग्रह व विवाह मंडल या अप्रतिम मूर्ती असून मुख्य मंडलातील गाभार्यात शिवलिंग आहे. तसेच सर्वाचे चित्त त्रिमूर्ती वेधून घेते. इतर ठिकाणी मानवती पार्वती, गंगा अवतरण, शिवशक्ती अर्धनारी, महायोगी शिव, कुलिहासाची मूर्ती, भैरव-महाबलाची मूर्ती अशी अन्य शिल्पेही पाहायला मिळतात. विविध शिवकथा स्नेहा नगरकर यांनी उलगडून सांगितल्या. दुपारी सर्वांनी स्नेहभोजन केले. घारापुरी लेण्यांच्या येथील बाजारपेठ अतिशय सुंदर असून तेथील नियम व शांतता मनाला भावते. ही लेणी आपल्या इतिहासाची साक्षीदार असून प्राचीन वैभव यातून दिसून येते. अशा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक ठिकाणी सहल विभाग प्रमुख डॉ. सुचित्रा ताजणे व त्यांच्या अन्य सहकारी प्राध्यापक वर्गाने आयोजित केली. अभ्यास आणि सहलीचा आनंद या दौर्यादरम्यान मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थी अतिशय आनंदात होते.
– वसुमती करंदीकर