“अभिव्यञ्जना” या अभिजात शास्त्रीय कलांची संस्कृतशी सांगड घालणार्या व्यासपीठाने दिनांक 22 जानेवारी 2017 रोजी कलेचे द्वितीय पुष्प सादर केले.
संस्कृत विभागाची विद्यार्थिनी असणार्या कनकवल्लीने आपल्या भरतनाट्यम् नृत्याविष्काराने सर्व रसिकांची मने जिंकली. अभिजात शास्त्रीय कलेची गोडी ही किती अवीट आणि मधुर असते याचा पुन:प्रत्यय दिला.
कित्येक शतकांपासून ’नृत्य“ हा परमेश्वराला अर्पण केल्या जाणार्या षोडशोपचार पूजेचाच एक भाग मानला गेला आहे. मंदिरांमध्ये गीत आणि वाद्य यांच्या साथीने नृत्यातूनच परमेश्वराला षोडशोपचार पूजा अर्पण करण्याची प्रथा फार प्राचीन आहे. परमेश्वराप्रती मनात असणारा भक्तीभाव व्यक्त करून त्या दिव्यत्वाची अनुभूती घेण्याचे ’नृत्य“ हे एक माध्यम आहे. संस्कृत ही तर देवांचीच वाणी! म्हणूनच भरतनाट्यम् नृत्य आणि संस्कृत यांच्या सुंदर मिलाफातून ती अनुभूती थोडी तरी अनुभवता यावी म्हणूनच कार्यक्रमाची संकल्पना-भक्तीनृत्य.
कोणत्याही कलेच्या अविष्कारासाठी परमेश्वराचा आशीर्वाद तर हवाच. आणि म्हणूनच कार्यक्रमाची सुरूवात झाली ती “महागणेश पंचरत्नम्” या अतिशय प्रसिद्ध असणार्या स्तोत्राने. नृत्याची सुरूवात होते न होते तोच कनकने आपले पदलालित्य, सुबक हस्तमुद्रा आणि चहेर्यावरील भावाविष्कार यांच्या साहाय्याने रसिकांच्या मनाची पकड घेतली.
परमेश्वराचा आशीर्वाद प्राप्त केल्यानंतर “रञ्जनीमृदुपंकजलोचनी” या “देवीपदम्” च्या सादरीकरणास सुरूवात झाली. हे देवीपदम् असल्याने साहजिकच त्यात देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडले.
त्यानंतर “वर्णम्” सादर करण्यात आले. वर्णम् म्हणजे नृत्त (footwork), नृत्य (अभिनय आणि भावाविष्कार) आणि नाट्य यांचा अनोखा संगम. हे वर्णम् म्हणजे जणू काही कार्यक्रमाचा आत्माच असतो.
“कृष्ण” ही एक अशी व्यक्तिरेखा आहे की कोणत्याही कलाकाराला आपल्या कलेच्या अविष्कारात कृष्णाला आणण्याचा मोह टाळता येतच नाही. अभिजात शास्त्रीय नृत्याची कोणतीही शैली असू दे. कृष्ण हा हवाच! मग तो यशोदेचा माखनचोर असू दे, सवंगड्यांसमवेत दहीहंडी रचणारा असू दे, यमुनेच्या तीरावर गोपींची छेडछाड करणारा असू दे, राधेचा सखा असू दे, गोवर्धन पर्वत उचलणारा असू दे, कालियामर्दन करणारा असू दे किंवा कंसाला ठार मारणारा असू दे. कोणत्याही रूपातला का होईना पण कृष्ण हा हवाच!
कनकवल्लीने सादर केलेल्या ’वर्णम्“ मध्ये कृष्ण भेटला तो गरीब ब्राह्मण सुदाम्याचा सहाध्यायी, त्याचा जिवलग मित्र. कृष्ण भलेही आता द्वारकाधीश झाला होता आणि सुदामा दारिद्रयाने त्रस्त झालेला गरीब ब्राह्मण होता. पण त्यांच्यातील मैत्रीला त्याचे काय? आपला बालमित्र असणार्या सुदाम्याला भेटून कृष्णाच्या आनंदाला काही पारावार उरला नाहीये. सुदामा मात्र आपली गरिबी सांगावी की नाही या विवंचनेत. कृष्णही गप्पच बसलेला. भेट संपते. सुदामा आपल्या घरी परततो. आणि त्याच्या लक्षात येते की आपली सर्व परिस्थितीच बदलून गेलेली आहे. दारिद्रय निघून गेले आहे. सुदाम्याला कळून चुकते की ही सर्व लीला त्या परमेश्वराची, श्रीकृष्णाची. हे कळल्यावर सुदामा नि:शब्द झाला आहे. कृष्णाविषयी आता त्याच्या मनात नुसतेच प्रेम नाही तर भक्तीचा झरा फुटलेला आहे. कृष्णामधील परमेश्वरी अंशाची जाणीव त्याला झालेली आहे. सुदाम्याच्या मनातील सखाभक्तीचा हा अविष्कार कनकने आपल्या मुद्राभिनयातून केवळ अप्रतिम व्यक्त केला. रसिकांनीही ऊत्सफूर्तपणे टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली.
याच “वर्णम्” मध्ये कृष्णाची अजूनही वेगवेगळी रूपे दिसली. यशोदेतील वात्सल्यभाव जागवणारा खोडकर कृष्ण तर लाजवाबच ! एकाच वेळी कृष्ण आणि यशोदा या दोन्ही भूमिका कनक फार सुंदर जगली. घरामध्ये लोणी काढणारी गृहिणी यशोदा तर फारच सुंदर. लोणी काढताना चेहर्यावर उडालेले लोण्याचे शिंतोडे पुसता पुसता एक नजर मात्र कृष्णावर ठेवणारी यशोदा तर केवळ लाजवाब! याशिवाय कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण आणि गोपींबरोबर रासक्रीडा करणारा श्रीकृष्ण तर होताच. या वर्णम् चे शब्द होते- “यादवकुल तिलकम्”.
यानंतर तुलसीदासांचे “श्रीरामचंद्र कृपालुभजमन” हे भजन सादर करण्यात आले. यात रामसीतेच्या स्वयंवराचा प्रसंग येतो. सीतेच्या स्वयंवरासाठी देशोदेशीचे वीर जमा झाले आहेत. आपल्या शक्तीचा, समार्थ्याचा गर्व असणारे असे हे वीर! पण त्या दैवी शिवधनुष्यापुढे मात्र कोणाचाच टिकाव लागत नाही. शिवधनुष्य उचलताना होणारी एकेका वीराची फजिती कनकवल्लीने आपल्या नृत्याभिनयातून फारच अप्रतिमरित्या दाखवली. आणि त्याचवेळी रामाची नम्रता, शिवधनुष्य उचलण्यातील त्याची सहजता हे बारकावे पण खूपच सुंदर रितीने दाखवले.
भक्तीनृत्याची सांगता झाली ती नृत्याची देवता – नटराज हिला वंदन करून. नटराज म्हणजे साक्षात शिव! नटराजाला समर्पित केलेले हे “पदम्” तामिळनाडूमधील चिदंबरम् मंदिराच्या जवळजवळ हजार खांबांमधून व्यक्त होणार्या शिवाच्या नृत्याचे वर्णन करणारे होते. प्रामुख्याने इथे नृत्य करणार्या नटराजाच्या स्वरूपात शिवाचे दर्शन घडते. या संपूर्ण नृत्यातून नटराज स्वरूपातील शिवाचे वेगवेगळ्या आकृतीबंधांमधून सुखद दर्शन घडते. हे “पदम्” खरोखरच नर्तिकेच्या शरीराची लवचिकता, स्थिरता, हस्तमुद्रांचा अचूक आणि नेमका वापर याचा कस लावणारे होते. हे नृत्य म्हणजे वर्षानुवर्षे चिकाटीने आणि भक्तीभावाने केलेल्या नृत्यसाधनेचे फलित म्हणता येईल.
कनकवल्लीने वयाच्या चौथ्या वर्षापासूनच भरतनाट्यम् नृत्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. “श्री. राजराजेश्वरी भरतनाट्यकलामंदिरचे कलैमामणि गुरू कल्याणसुंदरं पिल्ले” ह्या आपल्या गुरूंना आपल्या यशाचे श्रेय कनकवल्ली समर्पित करते. शास्त्रीय नृत्याबरोबरच कनकवल्लीचा कर्नाटकी संगीताचाही सखोल अभ्यास आहे. याचाच परिणाम म्हणजे कनकची सूर, ताल आणि लय यांच्यावर असणारी पकड !
नृत्य आणि संगीताबरोबरच संस्कृतच्या अध्ययनातही आपल्या बुद्धिमत्तेची चमक दाखवणार्या आमच्या कनकवल्लीला संस्कृत विभाग आणि अभिव्यञ्जनातर्फे तिच्या पुढील प्रवासासाठी मनापासून शुभेच्छा!
– सौ. श्रावणी माईणकर