










मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागात दिनांक १ मार्च २०२५ रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. हा दिवस प्रख्यात साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो. विभागप्रमुख डॉ.सुचित्रा ताजणे यांच्या कल्पनेतून या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराज लिखित ‘पसायदान’ याचे सस्वर पठण करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. माधवी नरसाळे यांच्या उद्बोधक मार्गदर्शनाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषा दिनाचे महत्त्व तसेच त्याच्या उत्सवामागील उद्देश समजावून सांगितला. त्यानंतर अध्यापिका श्रीमती मैथिली पोतनीस, अपूर्वा काळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यानंतर, डॉ. प्रसाद अकोलकर यांनी मराठीतील प्रधान वाङ्मय – ‘ज्ञानेश्वरी’ आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या साहित्यिक योगदानाबद्दल सखोल विवेचन केले. त्यांनी ‘ज्ञानेश्वरी’च्या शेवटच्या भागातील ‘पसायदान’ याचा संदर्भ देत, ‘पसायदान’ या शब्दाचा अर्थ ‘ईश्वरी कृपा वा वरदान’ असा असल्याचे स्पष्ट केले. तसेच, समाजाच्या कल्याणासाठी संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या प्रार्थनेचे तात्त्विक विश्लेषण विद्यार्थ्यांसमोर सादर केले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात, डॉ. मेधा देशपांडे यांनी आपल्या सुरेल वाणीने ‘पसायदान’चे पठण केले. त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या सादरीकरणाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले आणि उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापक भारावून गेले. विभागाची विद्यार्थिनी कु. सायली महाडिक हिने श्री समर्थ रामदास स्वामीरचित ‘मनाचे श्लोक’ यातील काही निवडक श्लोक गायिले आणि त्याचा थोडक्यात भावार्थ कथन केला.
या प्रकारे, संस्कृत विभागाने मराठी भाषा गौरव दिन अत्यंत प्रेरणादायी आणि संस्मरणीय पद्धतीने साजरा केला. हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये मराठी आणि संस्कृत साहित्यातील समृद्ध परंपरेबद्दल जागरूकता निर्माण करण्यास निश्चितच उपयुक्त ठरला.
-अपूर्वा काळे