शनिवार दि.२९ ऑगस्ट रोजी संस्कृत दिन तसेच विभागप्रमुख डॉ.गौरी माहुलीकर यांचा कार्यकालपूर्त्यर्थ सत्कार समारंभ संस्कृत विभाग, मुंबई विद्यापीठ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आला. फिरोझशहा मेहता भवनातील सभागृहात दुपारी ३.३० वाजता कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. विद्यापीठगीताने सुरुवात करण्यात आली. नंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विभागातील संशोधन साहाय्यक मेधा देशपांडे यांनी सरस्वतीवंदना सादर केली. डॉ.माधवी नरसाळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. त्यानंतर विभागातील विद्यार्थी मेहेरालोक ढापरे व वरदा ठोसर यांनी गुरुस्तुतीपर रचना सादर केली.
श्रीराम अय्यर आणि त्यांचे सहकारी यांनी शास्त्रीय-गीत-नृत्यप्रधान कार्यक्रम प्रस्तुत केला. नंतर संस्कृत भवन निर्मितीसंबंधित डॉ.गौरी माहुलीकर यांच्या मुलाखतीच्या चित्रफितीतील काही अंश दाखविण्यात आले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात, विशेष प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव व पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.प्रमुख अतिथी, भूतपूर्व विभागप्रमुख डॉ.सिंधु डांगे यांचा परिचय डॉ.सुनीता पाटील यांनी करून दिला. डांगे मॅडमच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमाच्या या भागाचे सूत्रसंचालन प्रा.सुचित्रा ताजणे यांनी केले. विभागप्रमुख डॉ.गौरी माहुलीकर यांचा कार्यकालपूर्त्यर्थ सत्कार समारंभ यानंतर संपन्न झाला. त्यांचे कुटुंबीय, सहकारी, विद्यार्थी, स्नेहीजन अशा अनेकांनी आपली भावपूर्ण मनोगते व्यक्त केली. कुलगुरू डॉ.संजय देशमुख यांनी समर्पक व हृद्य शब्दात आपले विचार मांडले. त्यानंतर माहुलीकर मॅडमच्या गौरवार्थ संपादित ‘गौरीगौरवम्’ व ‘Animals and Birds in Sanskrit Literature’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यानंतर सत्कारमूर्ती डॉ.गौरी माहुलीकर यांनी प्रासादिक, सहजसुंदर शैलीत आपले मनोगत व्यक्त केले. विभागातील प्राध्यापिका शकुंतला गावडे यांनी आभारप्रदर्शन केले. मेधा देशपांडे यांनी सादर केलेल्या संस्कृत पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.