मुंबई विद्यापीठाच्या गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासनाने “Critique on Dr. G.K. Bhat’s Contribution” या विषयावर दि.३० जुलै आणि ३१ जुलै २०१५ रोजी डॉ. गौरी माहुलीकर (गुरुदेव टागोर तौलनिक अध्यासन व संस्कृत विभागप्रमुख) यांच्या आधिपत्याखाली राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले. या चर्चासत्राचे उद्घाटन डॉ. विजया राजाध्यक्ष यांच्या अध्यक्षीय भाषणाने झाले. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या कुलगुरु डॉ. उमा वैद्य यांच्या अभ्यासपूर्ण बीजभाषणाने या चर्चासत्राचे प्रास्ताविक झाले. डॉ. सिद्धार्थ वाकणकर व डॉ. उर्मी शहा यांनी चर्चासत्राच्या विविध सत्रांची अध्यक्षपदे भूषविली.
एका त्रयस्थ दृष्टिकोनातून डॉ. भटांच्या वाङमयाचा त्यांच्या शिष्यांनी, विद्वान व समीक्षकांनी घेतलेला आढावा अत्यंत रंजक व प्रेरणादायी होता. विविध अभ्यासपूर्ण शोधनिबंधातून दिसणारी भट सरांची समीक्षणात्मक पण तरीही भावस्पर्शी अशी लेखनशैली प्रभावित करत होती. डॉ. गो. के. भट हे अत्यंत आदराने घेतले जाणारे नाव सर्वांना परिचित असले तरी या चर्चासत्रामुळे भट सरांचे व्यक्तिवाङमय सर्वांना अधिक सुपरिचित झाले.
सर्व विद्यार्थ्यांनी असा संकल्प केला की, “डॉ. भट सरांच्या विचारांप्रमाणे आता आम्हीही दरवर्षी कोणत्याही एका लेखकाच्या सर्व पुस्तकांचे वाचन करू..” हेच चर्चासत्राचे यश म्हणावे लागेल. चर्चासत्राचा समारोप मुंबई विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांच्या भाषणाने झाला. माननीय कुलगुरूंनी डॉ. गो. के. भटांच्या साहित्यकृतीचा अभ्यास करुन ‘Borrowing Bhasa’s eyes’ या विषयावर आजच्या काळाला अनुरुप असे दिलेले व्याख्यान उद्बोधक ठरले.