International Conference on Bhakti in Vaishnava Traditions

मुंबई विद्यापीठाचा संस्कृत विभाग, स्टॉकहोल्म युनिव्हर्सिटी, स्वीडन आणि भक्तिवेदान्त रिसर्च सेन्टर, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले त्रिदिवसीय आंतरराष्ट्रीय  चर्चासत्र (२१-२३ मार्च, २०२२) ’वैष्णव पंथांमधील भक्ति’ या विषयावर झूम व फेसबुक या आभासी माध्यमांद्वारे संपन्न झाले.   डॉ. शकुंतला गावडे,  डॉ. सुमन्त रुद्र व  डॉ. फर्डिनांडो सरडेला हे या चर्चासत्राचे प्रमुख आयोजक होते. डॉ. गोपाल गुप्ता (जॉन डनहॅम विशेष प्राध्यापक, ओरोरा युनिव्हर्सिटी, अमेरिका) यांनी या चर्चासत्राचे उद्घाटन केले तर वृंदावनच्या  श्री. श्रीवत्स गोस्वामी यांनी बीजभाषण सादर केले. गौरांग दास यांनी ‘भक्तिरसामृतसिंधू ‘ या  ग्रंथावरील विशेष व्याख्यानात भक्तीच्या विविध प्रकारांचे विवेचन केले. 

डॉ. रवी गुप्ता (उताह स्टेट युनिव्हर्सिटी ,अमेरिका) यांनी  चैतन्य वैष्णव संप्रदायामध्ये  आंतरधर्मीय संवादाची  बीजे असल्याचे प्रतिपादन केले. ऑक्सफर्ड सेंटर फॉर हिंदु स्टडीज , लंडन येथील वरिष्ठ संशोधक  डॉ. केनेथ वालपे यांनी गौडीय वैष्णव संप्रदायाच्या भक्तिग्रंथांमधील स्थलविशेषांचा चिकित्सक आढावा घेतला. डॉ.अभिषेक बोस यांनी चैतन्य वैष्णव संप्रदायातील लौकिक व पारलौकिक भक्ती  यावर भाष्य केले. डॉ. पद्मनाभन व  डॉ. रंगनायकी यांनी अनुक्रमे विशिष्टाद्वैत तत्त्वप्रणाली व आळवार संतांच्या  भक्ती संकल्पनेवर शोधनिबंध सादर केले.  वल्लभाचार्यांची वंशज व अमेरिकेच्या इंडियाना युनिव्हर्सिटीमध्ये पी.एच. डी. करणाऱ्या  प्रकृती गोस्वामीने शुद्धाद्वैत संप्रदायातील भक्ती संकल्पनेचा  चिकित्सक मागोवा घेतला.सोफाया युनिव्हर्सिटी, जपान येथील सहयोगी प्राध्यापक  कियोकाझु ओकिता यांनी  भागवत  चतु:श्लोकीवरील  मध्वाचार्यांच्या  भागवत तात्पर्य निर्णय या टीकेचा विशेष संदर्भ घेत भक्ती संकल्पनेवर शोधनिबंध सादर केला.  डॉ.  सिद्धार्थ सप्तति यांनी ओडिया भागवतात दृश्यमान होणाऱ्या भक्ती संकल्पनेचा  धांडोळा घेतला. डॉ . शकुंतला गावडे यांनी ‘गोवर्धन-हरिदासवर्य’ या विषयावर शोधनिबंधाचे  वाचन केले. वारकरी संप्रदायातील भक्तीचा यथोचित विमर्श डॉ. प्रसाद अकोलकर यांनी घेतला तर भागवतावरील  हरीवरदा व भैरवी या दोन मराठी टीकांवरील  अध्ययन डॉ. माधवी नरसाळे यांनी प्रस्तुत केले. डॉ. पूर्णिमा दवे यांनी स्वामी नारायण संप्रदाय व निंबार्क संप्रदायातील भक्ती संकल्पना तौलनिक पध्दतीतून प्रस्तुत  केली. डॉ. श्रीराम अय्यर यांनी मधुसूदन सरस्वतीच्या भक्तिरसायन या ग्रंथावर शोधनिबंधाचे वाचन केले. डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. निर्मला  कुलकर्णी आणि डॉ. कला आचार्य या ज्येष्ठ विदुषींनी सत्राध्यक्षपदे  भूषविली.

रामानुजाचार्य यांची विशाल मूर्ती ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’  उभारण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या चिना जियार स्वामी यांची  प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती चर्चसत्राच्या समारोपाच्या कार्यक्रमामध्ये लाभली . भक्ती, वैष्णव , नारायण देवता या सर्वांवर भाष्य करताना त्यांनी वैष्णव संप्रदाय एकात्मतेचा संदेश देत असल्याचे प्रतिपादन केले.  रामानुजाचार्यांनी  विश्वाच्या कणाकणामध्ये ईश्वर असल्याचे मान्य केल्याने   भक्तीसोबत सेवाभाव महत्त्वाचा असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला मुंबई विद्यापीठाच्या मानव्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. राजेश खरात  यांची विशेष उपस्थिती लाभली. इस्रायलच्या झेफत कॉलेज, हिंदु अध्ययन विभागतील इथामार थिओडोर यांचे भागवतामधील भक्ती रस या विषयावर विशेष व्याख्यान झाले. मुंबई विद्यापीठातील संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. शकुंतला गावडे यांच्या आभारप्रदर्शनाने या चर्चासत्राचा समारोप झाला.  

डॉ. शकुंतला गावडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

PAGE TOP